आनंद

आज 'आनंद' रिलीज होऊन काही तरी ५३ वर्षे झाली म्हणे. याचा अर्थ गेल्या त्रेपन्न वर्षांपासून आनंद लोकांना जगायला शिकवत आला आहे आणि इथून पुढंही राहील. 

तसं कित्येकांनी बरंच काही लिहून ठेवलेलं असताना आपणही या पिक्चरबद्दल लिहावं की नको, असा प्रश्न मनात होता. मात्र मोह आवरता आला नाही. भारतीय लोक प्रत्येक स्टोरीमध्ये लव्ह स्टोरी घुसवतात, असा आरोप करणाऱ्या कित्येक विदेशी लोकांना आणि चित्रपट सृष्ट्यांना हा पिक्चर म्हणजे हृषीकेश मुखर्जी यांनी मारलेली बिन आवाजाची जोरदार चपराक आहे, असं मला नेहमी वाटत आलं आहे.

आयुष्यात दुःख कुणाला नसतं? कुणाच्या वाट्याला कधी सगळं सुख येतं का? किंवा एक घासून पुसून गुळगुळीत केलेलं उदाहरण म्हणजे आमचा ग्लास 'अर्धा रिकामा' पेक्षा 'अर्धा भरलेला' हे बघायला शिकवणारा हा पिक्चर खरं तर किशोरसाठी तयार होणारा! पण किशोरच्या म्हणे, वॉचमनमुळं तो राजेश खन्नाला मिळाला. म्हणजे प्रारब्ध की काय म्हणतात ना, ते असं! 

साल १९७१, अजून बच्चन नावाची आँधी चित्रपटगृहावर धडक मारायची होती आणि राजेश खन्नाच्या गुलाबी जर्द रोमान्सचा माहोल असताना 'आनंद' येणं आणि तो राजेश खन्नानं जगणं (करणं नाही तर जगणंच), ही गोष्ट खूप मोठी! पण काहीही करून हा पिक्चर सुटता कामा नये, म्हणून झगडणारा काका काय मस्त अभिनय करू शकतो, हे त्याला ट्रोल करणाऱ्यांनी एकदा का होईना बघावंच! या अभिनयातून काकानंही अशा अनेकांची बोलतीच बंद केली.

पहिल्याच मुलाखतीत डॉक्टरला, "क्या यार अभी तक एक कंपाउंडर पैदा नहीं कर सके?" असं विचारणारा आनंद "जिंदगी बडी होनी चाहीये बाबूमोशाय, लंबी नहीं!" असं म्हणत, हसत हसत डोळ्यात पाणी कधी देऊन जातो, कळतही नाही. 

आपल्या कॅन्सरचं भलंमोठं शास्त्रीय नाव ऐकून 'आजार व्हावा, तर असा मोठ्या नावाचा' म्हणून खुश होणारा आनंद 'कही दूर जब दिन ढल जाये' म्हणताना तितकाच कापरा होतो आणि बघणाऱ्यांना पण करून जातो. तसं हे गाणंच अजरामर, पण त्यातल्याही 

'घनी थी उलझन, बैरी अपना मन
अपना ही होके सहे दर्द पराये' 

या ओळी तर अगदी काळजावर कोरून ठेवाव्या अशा! 

ललिता पवारला "बांध के मुझे कोई रख नहीं पायेगा मम्मी, ठीक निकल जाऊंगा!" म्हणणारा किंवा "तुझे क्या आशिर्वाद दू बहन, यह भी नहीं कह सकता की मेरी उम्र तुझे लग जाये!" असं सीमा देवला बघून पुटपुटणारा आनंद मनाला चुटपुट लावल्याशिवाय जात नाही.

इतकं करूनही दुःखाच्या बाबतीत मात्र मी मोठा स्वार्थी आहे आणि म्हणूनच ते मी कुणाशी वाटून घेत नाही, असं सांगायलाही हा आनंद कमी करत नाही. प्रेयसीचं लग्न होऊन तीन महिने झाले आणि त्याच दिवशी दिल्लीहून मुंबईला आलेला आनंद आपली दुःखाची पोतडी मात्र नेहमी करकचून बांधून ठेवतो, अगदी कुणालाही उघडता येऊ नये, अशी! 

पिक्चरच्या शेवटी आनंद मरणार आहे, हे माहीत असूनही एखादा चमत्कार घडावा अशी भाबडी आशा मनात ठेवून प्रार्थना करणारी हिंदू सीमा देव, मुस्लिम जॉनी वॉकर आणि ख्रिश्चन ललिता पवार ही जुन्या काळातली टिपिकल पण एकतेचा संदेश देणारी केमिस्ट्री ऋषीदांनी अप्रतिम साकारली. पण त्याहूनही "हम सब रंगमंच की कठपुतलियां हैं जिसकी डोर ऊपर वाले के हाथ में है, कौन कब कहां उठेगा, कोई नहीं जानता!" या डायलॉगनंतर आनंदच्या आयुष्यासोबत संपणारी कॅसेटची टेप अक्षरशः काळीज पिळवटून टाकते.  

पण अशा कित्येक कॅसेटच्या रील संपल्या तरी जोवर हा पिक्चर, त्यातला काकाचा अभिनय आणि अतिशय शांत पण मनात घुसणारे डायलॉग ऐकून लोकांच्या डोळ्यांत पाणी येत राहील, तोवर बच्चनचा शेवटचा डायलॉग आनंदसारखा अजरामर असेल,

"आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं..."

- प्रतिराज मांगोलीकर

Comments